मुंबई प्रतिनिधी
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मकरसंक्रांतीपूर्वी दिलासादायक बातमी आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना योजनेच्या हप्त्यांवरून काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असली, तरी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्य शासनाने १ जानेवारी २०२६ रोजी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला होता. त्यानंतर लाभार्थी महिलांना डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या हप्त्यांची प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मकरसंक्रांतीपूर्वी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येतील, अशी घोषणा केली. त्यानुसार पात्र महिलांना एकूण ३ हजार रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या निधीवाटपावर आक्षेप घेत, महिलांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना ही आधीपासून सुरु असलेली योजना आहे. न्यायालयाने याआधीच या योजनेला स्थगिती देण्यास नकार दिला असून, आचारसंहितेच्या काळात सुरु असलेल्या योजनांचे लाभ थांबवता येत नाहीत. “विरोधक कितीही तक्रारी केल्या, तरी लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
संक्रांतीनंतरच्या दिवशी मतदान असले, तरीही योजनेच्या लाभावर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना १४ जानेवारीपूर्वी रक्कम मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
मात्र, प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले असल्याने आयोग यावर नेमका काय निर्णय देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


