मुंबई प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि शिवसेनेत तब्बल ५९ वर्षे सक्रिय असलेले दगडू दादा सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. लालबाग–परळसारख्या शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात घडलेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी सकाळी अकरा वाजता झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात सकपाळ यांच्यासह लालबाग, परळ आणि शिवडी परिसरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
‘हे नाते तोडणे सोपे नव्हते’
पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना दगडू दादा सकपाळ भावूक झाले होते. “मी आयुष्याची ५९ वर्षे एकाच घरात घालवली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही घडलो. मात्र गेल्या काही काळात निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची भावना मनात बळावत गेली. निर्णयप्रक्रियेत सन्मान उरलेला नाही. ज्या पक्षात विचारांना किंमत उरत नाही, तिथे थांबणे कठीण होते. आज इथून बाहेर पडताना छातीवर दगड ठेवावा लागला आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा विश्वास व्यक्त करत, “धनुष्यबाण हा शिवसेनेचा खरा वारसा आहे. त्यामुळे मी हा मार्ग निवडला,” असे सकपाळ म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर शिंदेंची टीका
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली. “आजचा दिवस शिवसेनेच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. दगडू दादा हे शिवसेनेचे पायाचे दगड आहेत. ज्यांनी घरदार सोडून, लाठ्या-काठ्या झेलून लालबाग–परळमध्ये शिवसेना उभी ठेवली. आज त्यांनाच अपमानित होऊन पक्ष सोडावा लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे,” असे शिंदे म्हणाले.
“ज्या वेळी पायाचा दगड निखळतो, तेव्हा इमारत कोसळायला वेळ लागत नाही. उद्धव ठाकरेंना निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत उरलेली नाही,” असा आरोप करत, दगडू दादांच्या प्रवेशाला ‘लालबागच्या राजाचा आशीर्वाद’ असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
दक्षिण मुंबईत थेट लढत अटळ?
दगडू दादा सकपाळ हे लालबाग, परळ आणि शिवडी परिसरातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे त्यांचा जनसंपर्क मोठा असून, महानगरपालिका निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईत ठाकरे गटाला मिळणाऱ्या बळामागे त्यांचा वाटा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र सकपाळ यांच्या निर्गमनामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शेकडो कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रवेशामुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात थेट आणि चुरशीचा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात कोण वर्चस्व राखणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


