मुंबई प्रतिनिधी
मुंबईतून हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी राबवलेली विशेष मोहीम मोठ्या यशाने पूर्ण झाली आहे. या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये छापे टाकून १,६५० मोबाईल संच हस्तगत करण्यात आले असून, या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे २ कोटी रुपये इतकी आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने प्रत्येक परिमंडळात स्थापन करण्यात आलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) पथकातील अधिकारी व अंमलदारांची एकूण १३ स्वतंत्र पथके उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली होती. या पथकांनी विविध जिल्ह्यांमध्ये समन्वयाने शोधमोहीम राबवून चोरीचे मोबाईल शोधून काढले.
विशेष बाब म्हणजे, CEIR प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे आतापर्यंत मुंबई पोलिसांनी एकूण ३३,५१४ हरवलेले किंवा चोरीचे मोबाईल हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी तसेच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सर्व परिमंडळीय पोलीस उपआयुक्त आणि CEIR नोडल अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, मोबाईल चोरी किंवा हरवण्याच्या घटनांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना :
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर मोबाईल तात्काळ ब्लॉक करावा.
अनोळखी व्यक्तीकडून जुने मोबाईल खरेदी करण्याचे टाळावे.
जुना मोबाईल खरेदी करताना तो चोरीचा नाही ना, याची खात्री करण्यासाठी ‘Sanchar Sathi’ ॲप किंवा १४४२२ या क्रमांकावर IMEI क्रमांक पाठवून तपासणी करावी.
मोबाईल चोरीसारख्या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंबई पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक ठरत आहे.


