पुणे प्रतिनिधी
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा आज शुक्रवारपासून (ता.९) सुरू होत आहे. आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारपासून विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीची लिंक सुरु करण्यात येणार आहे.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रकिया जाहीर केली आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रकिया सुरू न झाल्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले होते. प्राथमिक शिक्षण विभागाने अखेर ही प्रक्रिया जाहीर केली. या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणीनंतरचा महत्वाचा टप्पा शाळा पडताळणीचा (व्हेरिफिकेशन) असतो.
या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा पडताळणी करताना बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशासाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रविष्ट होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येईल, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांना ज्या मंडळाची मान्यता आहे, तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का, याची खात्री करण्यात यावी. ९ ते १९ जानेवारी या कालावधीत विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना गोसावी यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महापालिकेचे प्रशासन अधिकारी, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.


