पिंपरी प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षभरात एकूण गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केला. खुनाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असली, तरी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे सायबर फसवणुकीच्या प्रकरणांतून २४ कोटी ३८ लाख रुपयांहून अधिक रक्कम नागरिकांना परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.
आयुक्तालयाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा देताना आयुक्त चौबे म्हणाले की, २०२५ मध्ये खुनाच्या ६३ घटना घडल्या असून २०२४ मधील ८५ घटनांच्या तुलनेत त्यात २२.८५ टक्के घट झाली आहे. यापैकी २१ खून प्रेमसंबंधातून, तर जुन्या वादातून सात खून झाले. मात्र खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वाढ नोंदली गेली आहे. २०२४ मध्ये १६८ प्रकरणे दाखल झाली होती, तर २०२५ मध्ये हा आकडा १९४ वर पोहोचला आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत बोलताना चौबे यांनी सांगितले की, बलात्काराच्या ३०१ घटना नोंदल्या गेल्या असून त्यापैकी २९९ घटना परिचित व्यक्तीकडून झाल्या आहेत. यातील १२० घटना लग्नाचे आमिष दाखवून केल्याचे निष्पन्न झाले. विनयभंगाच्या ३९२ घटनांची नोंद असून त्यातील ३७६ घटना परिचितांकडून झाल्या आहेत.
मालमत्तेविरोधी गुन्ह्यांत दरोड्याच्या गुन्ह्यांत घट झाली असून केवळ २० प्रकरणे दाखल झाली आहेत. जबरी चोरीचे १८२, सोनसाखळी चोरीचे ७५, तर घरफोडीचे २८५ गुन्हे नोंदवले गेले. वाहनचोरीचे ९०६ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी २४३ पिस्तूल आणि ९०८ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण गुन्हेगारीत घट झाल्याचा पुनरुच्चार आयुक्त चौबे यांनी केला.
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत आयुक्तालयाच्या हद्दीत २६९ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ११२ गुन्ह्यांची उकल करत २१५ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८४२ रुपये वसूल करून ती रक्कम संबंधित फसवणूकग्रस्त नागरिकांना परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
संघटित गुन्हेगारीवर कारवाई करताना मागील वर्षात ४५ टोळ्यांमधील २१३ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. ३५ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले, तर ३६८ जणांना तडीपार करण्यात आले. याशिवाय अवैध धंद्यांविरोधात पाच हजार ८१८ कारवाया करून १६ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून आयुक्तालयाच्या हद्दीतील एक हजार ४५ संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे सातत्याने पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चार हजार ५८० चालकांवर, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, काळी काच, सायलेंसर बसविणे तसेच जड-अवजड वाहनचालकांवर कारवाई करून एकूण ३२ कोटी ८४ लाख ९० हजार ७२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यावेळी सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली उपस्थित होते.


