मुंबई प्रतिनिधी
मुंबईचे हृदय मानल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या थरारक घटनेत एका ४० वर्षीय महिलेने समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले.
दुपारी ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने काही काळ मरीन ड्राईव्ह परिसरात खळबळ उडाली होती. पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालक घटनास्थळी जमा झाले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील कॉलम चर्च परिसरात राहणारी सैफी (४०) ही महिला गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मरीन ड्राईव्ह येथे आली. काही वेळ समुद्राकडे पाहत उभी राहिल्यानंतर तिने अचानक समुद्राच्या दिशेने पाऊल टाकत पाण्यात उडी घेतली. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
नियंत्रण कक्षाने तातडीने मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याच्या ‘मोबाईल युनिट ५’ ला वायरलेस संदेश दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तडवी, महिला पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई कदम आणि अन्य कर्मचाऱ्यांचे पथक काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी समुद्राला भरती असल्याने लाटांचा जोर प्रचंड होता. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी महिलेला पकडून लाटांशी झुंज देत सुखरूप किनाऱ्यावर आणले.
महिलेला समुद्रातून बाहेर काढताना तिच्या पायाला दुखापत झाली होती. तिला तत्काळ रुग्णवाहिकेतून जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात ती मानसिक तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधत असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
दरम्यान, वेळेत मदतीला धावून जाऊन धाडसाने महिलेचा जीव वाचवणाऱ्या पोलिस पथकाचे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे आणखी एक अनमोल जीव वाचल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


