मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पक्षाने बंडखोरीविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी करणाऱ्या किंवा पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईसह सोलापूर, नागपूर आणि जळगाव येथील एकूण ११३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर निलंबन व हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केल्याच्या आरोपावरून भाजपने २६ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांच्यासह दिव्या ढोले, जयमुरगन नाडार आणि शोभा साळगावकर यांचा समावेश आहे. पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच बंडखोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.
सोलापूर महापालिकेतही बंडखोरीचा फटका पदाधिकाऱ्यांना बसला असून माजी उपमहापौर, चार माजी नगरसेवकांसह २८ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्या तसेच अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली. भाजपने येथे १०२ अधिकृत उमेदवार जाहीर केले होते.
नागपूरमध्येही पक्षशिस्त भंगाच्या प्रकरणात भाजपने २२ कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. स्थानिक पातळीवर अनुशासन राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले असून, त्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जळगावमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना आव्हान देणाऱ्या बंडखोरांवर भाजपने कठोर पावले उचलली आहेत. पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपावरून जितेंद्र मराठे यांच्यासह २७ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीतील अंतर्गत विरोधामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बंडखोरीविरोधात भाजपने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


