मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असताना, गुरुवारी मुंबईत घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने मात्र चर्चेला वेगळेच वळण दिले. राजकीय कट्टर विरोधक मानले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची समोरासमोर भेट झाली. विशेष म्हणजे, या भेटीत राजकीय कटुतेपेक्षा माणुसकीचे दर्शन घडले.
गुरुवारी मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांची मुलाखत आटोपून ते स्टुडिओबाहेर पडत असतानाच संजय राऊत पुढील मुलाखतीसाठी स्टुडिओकडे जात होते. याच वेळी दोघांची अचानक आमनेसामने भेट झाली. क्षणभर थांबून दोघांनी एकमेकांकडे पाहत अभिवादन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संजय राऊत नुकतेच गंभीर आजारपणातून सावरले आहेत. उपचाराच्या काळात ते घरी असताना एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रत्यक्ष भेटीत शिंदे यांनी राऊत यांची तब्येत कशी आहे, अशी आपुलकीने चौकशी केली. याला प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनीही शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर काही क्षण जुजबी संवाद झाला आणि दोन्ही नेते आपापल्या मार्गाने पुढे निघून गेले.
ही भेट अल्पकाळाची असली, तरी तिचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
२०२२ मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. पुढे विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाने ६० जागांवर विजय मिळवला. या साऱ्या घडामोडींनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. संजय राऊत यांनीही अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
अशा पार्श्वभूमीवर, गुरुवारी घडलेली ही भेट राजकीय विरोधाच्या पलीकडे जाऊन मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली. राजकारण कितीही तीव्र असले, तरी वैयक्तिक पातळीवर माणुसकी जपली जाते, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले, अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.


