पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या सणाच्या दिवशीच एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेमुळे पुनावळे परिसरात शोककळा पसरली आहे.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (२४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (२०, रा. पुनावळे) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. या प्रकरणी ट्रकचालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्यप्रदेश) याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील शिंदे कुटुंबाचा मिरची कांडपाचा व्यवसाय आहे. ऋतुजा आणि नेहा या त्यांच्या दोनच मुली होत्या. ऋतुजाने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते, तर नेहा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. बुधवारी दुपारी काही कामानिमित्त दोघी दुचाकीवरून जात असताना काळेवाडी येथे पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली.
या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले.
मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी दोन तरुण बहिणींचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.


