सातारा प्रतिनिधी
निवडणुका जवळ आल्या की जावळी तालुक्यातील काही विरोधकांना अचानक जनतेचा खोटा कळवळा येतो. मंत्रिपदावर आणि सत्तेत असताना तालुक्याच्या विकासासाठी एकही दमडी न देणाऱ्यांनी आता जनतेचा बुद्धिभेद करू नये, अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची ताकद जावळीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात आहे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
आंबेघर (ता. जावळी) येथे आयोजित स्नेहमेळावा तसेच कुसुंबी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजू भैया भोसले, अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, पांडुरंग जवळ, मेढ्याच्या नगराध्यक्ष रूपाली वारागडे, विलासबाबा जवळ, बबन बेलोशे, हरिभाऊ शेलार, मारुती चिकणे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकशाहीत मतदार हा खरा राजा आहे. जावळीतील जनतेने दिलेल्या भरभरून प्रेमामुळे सलग तीन वेळा आमदार म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासकामांचा वेग वाढवला असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवण्यात येतील. सर्व भाजप उमेदवार निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचा उल्लेख करत, भविष्यात नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. मेढा शहरात विविध योजना राबवून ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर विकास केला जाईल. जावळी तालुक्यातील सर्व गावांतील स्मशानभूमींना जोडणारे पक्के रस्ते, नागरी सुविधा, पर्यटनाला चालना आणि बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“दिलेला शब्द पाळण्याची परंपरा स्व. भाऊसाहेब महाराजांपासून सुरू आहे. मीही दिलेला शब्द पाळतो; त्यामुळेच जावळीतील जनता कायम माझ्या पाठीशी उभी आहे,” असे सांगत विरोधकांनी तालुक्यात प्रत्यक्ष विकास न करता केवळ स्वार्थासाठी बाहेरून येऊन राजकारण केल्यास जनता त्यांची योग्य जागा दाखवेल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाहीही मंत्री भोसले यांनी दिली.
यावेळी ज्ञानदेव रांजणे म्हणाले, कुसुंबी गटात ९१ गावे व ६५ बूथ असून प्रत्येक गावात संघटन मजबूत केले आहे. येणाऱ्या निवडणुकांत मंत्री भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून आणून विरोधकांना पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने धोबीपछाड देऊ.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ शेलार यांनी केले, तर सुधाकर शेलार यांनी आभार मानले. विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.


