सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही, तसेच साहित्य संस्थांच्या कार्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. मराठी भाषेचा सन्मान आणि तिचा विस्तार वाढवण्यालाच सरकारचे प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्यात भरवण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. “हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले असून, आता होणारे शंभरावे साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यति’ असे व्हावे, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक रघुवीर चौधरी, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार महेश शिंदे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे संरक्षक ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर आणि व्ही. पी. परांजपे ऑटो कास्टचे उपाध्यक्ष ऋषिराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “माय मराठीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब आहे. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच सुरू केले जाईल. दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने भाषा केंद्र सुरू करण्यात आले असून, विविध देशांत आंतरराष्ट्रीय मराठी मंच कार्यरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असले तरी मराठी ही केवळ संवादापुरती न राहता जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” यंदाच्या संमेलनासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.
गावागावांत आणि एसटी स्थानकांवर पुस्तकविक्रीसाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली होती. त्यास प्रतिसाद देताना शिंदे म्हणाले, “फक्त आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर माझा भर आहे. परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाईल.”
दरम्यान, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करत, राज्य सरकार साहित्य संमेलनांची ताकद वाढवण्याचेच काम करीत असल्याचे सांगितले. आगामी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आजवरच्या संमेलनाध्यक्षांना ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सन्माननिधी, तर शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांना महादजी शिंदे यांच्या नावाने वर्षभर सन्माननिधी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाचे स्मारक उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
चार दिवस चाललेल्या या संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून, जवळपास आठ लाख साहित्यरसिकांनी संमेलनाला भेट दिली. “या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पुढील नाट्यसंमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे,” अशी अपेक्षा स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.


