नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारत–रशिया संबंधांचा नवा पर्व ठरू शकणारी २३ वी द्विपक्षीय शिखर परिषदेची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. केवळ आर्थिक सहकार्यापुरते हे शिखर बैठक मर्यादित न राहता क्रीडा, आरोग्य, अणुऊर्जा, उच्च-तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण आणि जागतिक सुरक्षितता या सर्वच क्षेत्रांवर करार व निर्णयांची मालिका आज जाहीर झाली.
धोरणात्मक भागीदारीचे २५ वर्षे : विश्वासाचा नवा अध्याय
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन…” या संबोधनाने करत, भारत–रशिया संबंधांचा ऐतिहासिक आणि भावनिक पाया अधोरेखित केला.
“पंचवीस वर्षांपूर्वी पुतिन यांनी या भागीदारीचा पाया रचला. काळाच्या कसोटीवर हे नाते अधिक दृढ झाले,” असं मोदी म्हणाले.
जगातील अनेक भू-राजकीय उलथापालथींमध्ये भारत–रशिया मैत्री ‘मार्गदर्शक ताऱ्यासारखी स्थिर’ राहिल्याचं त्यांनी नमूद केलं.
A ते Z करार: आरोग्यापासून नौवहनापर्यंत
परिषदेदरम्यान दोन्ही देशांनी खालील प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करणाऱ्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या
• आरोग्य व औषधनिर्मिती
• शिक्षण व सांस्कृतिक देवाणघेवाण
• अन्नसुरक्षा
• नौवहन व वाहतूक
• खत व कृषी क्षेत्र
• सीमाशुल्क आणि डिजिटल टपाल व्यवस्था
• कामगार, दूरसंचार व तंत्रज्ञान हस्तांतरण
हे करार द्विपक्षीय व्यापाराला नवे आयाम देणार असल्याचा मोदी यांनी विश्वास व्यक्त केला.
व्यवसाय मंचाला चालना, सह-उत्पादन व सह-नवोपक्रमाची दिशा
मोदी–पुतिन यांनी आजच्या परिषदेनंतर भारत–रशिया बिझनेस फोरमला मिळालेल्या गतीकडे विशेष लक्ष वेधले.
“नवीन सहकार्यामुळे निर्यात, सह-उत्पादन आणि सह-नवोपक्रमाची नवी दारे उघडतील,” पंतप्रधान मोदी.
युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) लवकरात लवकर व्हावा, यासाठी दोन्ही बाजू प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पर्यटनाला बुस्ट रशियन नागरिकांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
भारतीय पर्यटन आणि सांस्कृतिक संबंधांना गती देण्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली.
रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा आता उपलब्ध होणार आहे.
यामुळे लोकांतून-लोकांत मैत्री अधिक वाढेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
दहशतवादाविरोधात ठाम एकवटलेलं धोरण
पहलगाम हल्ला आणि रशियातील क्रोकस सिटी हॉलवरील हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले
“दहशतवाद हा मानवतेवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी जागतिक एकता हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.”
भारत–रशिया या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे राहिले असल्याची त्यांनी आठवणही करून दिली.
युक्रेन संघर्ष मोदींची स्पष्ट भूमिका, पुतिनची प्रतिक्रिया
युक्रेनमधील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी सखोल चर्चा केल्याचंही उघड केले.
मोदी म्हणाले
“भारताने सुरुवातीपासूनच शांततेचा पुरस्कार केला आहे. टिकाऊ तोडगा शोधण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे स्वागत करतो.”
पुतिन यांनीही युक्रेन युद्धावर आपल्या बाजूने माहिती देत सांगितले की ते “काही भागीदारांसोबत शांततापूर्ण निवेदनावर काम करत आहेत”, त्यात अमेरिकेचाही सहभाग असल्याचे त्यांनी सूचित केले.
अणुऊर्जा क्षेत्रात भारत–रशिया सहकाराची नवी उंची
पुतिन यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करत सांगितलं,
भारतासाठी बांधण्यात येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पातील सहापैकी तीन अणुभट्ट्या कार्यान्वित झाल्या असून त्या वीजजाळ्याशी जोडल्या गेल्या आहेत.
याशिवाय उच्च-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य वाढवणार आहेत.
‘कालच्या जेवणातील चर्चा महत्त्वपूर्ण’ पुतिन
शिष्टमंडळीय जेवणातील संवादाबद्दल पुतिन म्हणाले,
“काल पंतप्रधान मोदींसोबत झालेली चर्चा फार महत्त्वाची होती. आम्ही मैत्री व भागीदारीच्या भावनेने प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.”
मैत्रीचे नवे पर्व सुरू?
आजच्या बैठकीत आर्थिक, सामरिक, ऊर्जा, तांत्रिक आणि लोकसांस्कृतिक संबंधांमध्ये बहुआयामी प्रगतीचे संकेत मिळाले.
भारत–रशिया भागीदारीचे २५ वे वर्ष सुरू होत असताना, दोन्ही देशांनी पुढील दशकासाठी ‘विश्वास’, ‘शांतता’ आणि ‘सहविकास’ हे तीन आधारस्तंभ स्पष्टपणे अधोरेखित केले.


