बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटना अखंड सुरूच आहेत. पालकमंत्री बदलले, जिल्हा पोलीस प्रमुख बदलले; मात्र जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आवरण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचीच ही ताजी घटना दाखल. गेवराई तालुक्यात नांदगाव येथील ग्रामसेवकावर गावगुंडांनी अमानुष हल्ला चढवला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
जालिंदर सुरवसे असे संबंधित ग्रामसेवकाचे नाव असून त्यांना लोखंडी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरीरावर काळे-निळे वळ उठले असून ही मारहाण कोणत्या कारणातून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आई आणि बहिणीच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरूरमध्ये विद्यार्थ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण
जिल्ह्यातील मारहाणीच्या मालिकेत शिरूर तालुक्यातील रायमोह येथे आणखी एक प्रकार घडला. अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर पाच-सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका शालेय विद्यार्थ्यावर धाडसी हल्ला करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शाळेच्या गेटबाहेरच विद्यार्थी असुरक्षित असल्याचे चित्र समोर येत असल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न अधिक गडद
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हे रोखण्याऐवजी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र नागरिकांसमोर आहे. जिल्ह्यात भीतीचं सावट गडद होत असून कठोर उपाययोजना करण्याची मागणीही वाढत आहे.
अशा घटनांनी जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची अवस्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे.


