बीड प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकीच्या आदल्या रात्री बीड शहरात चांगलाच खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पेठ बीड परिसरात दोन तरुण स्कुटीवरून फिरत नागरिकांना रोख रक्कम वाटत असल्याचा आरोप करण्यात आला असून, संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या ‘पैशाच्या वाहत्या पावसामुळे’ राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
बीड : नगरपालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, स्कुटीच्या डिक्कीत वाटपासाठी तगडी रक्कम ठेवली; पाहा व्हिडीओ pic.twitter.com/2DqARlRokB
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) December 2, 2025
आज सकाळपासून जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झाली असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ४३४ मतदान केंद्रांपैकी ४५ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सुरक्षेची कडक तयारी केली आहे.
कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सकाळच्या सत्रात मतदान शांततेत पार पडत असल्याची माहिती मिळत असली तरी, स्कुटीद्वारे पैसे वाटपाच्या प्रकरणाने वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, त्याच्या निष्कर्षाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


