सातारा प्रतिनिधी
सातारा-रहिमतपूर मार्गावर गुरुवारी दुपारी अंगापूर फाट्याजवळ घडलेल्या एका विचित्र प्रकाराने परिसरातील नागरिकांची एकच भंबेरी उडाली. रस्त्याच्या मध्यभागी एक तरुण अचानक हात-पायांवर रांगू लागला. मध्येच थबकून तो कुत्र्यासारखा दोन गुडघ्यांवर बसत, जीभ बाहेर काढत गुरगुरण्यासारखे वर्तन करू लागला. या दृश्याचा प्रत्यय येताच मार्गावरील नागरिकांनी धावाधाव करत स्वतःचे प्राण वाचवले. दरम्यान, या तरुणाचे विचित्र हालचालींचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले.
संबंधित तरुणाची ओळख गोपाल भील (वय २३, रा. शहादा, जि. नंदुरबार) अशी झाली असून तो ऊसतोड कामगारांच्या पथकासोबत साताऱ्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. पंधरवड्यापूर्वी कुत्र्याने चावा घेतल्यानंतरही त्याने आवश्यक उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली असावीत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तरुणाजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावर तो अचानक गुरगुरत अंगावर धावून जात असल्याने नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहता काही स्थानिक युवकांनी खबरदारी म्हणून वाघरीच्या साहाय्याने त्याला नियंत्रणात आणले. त्यानंतर त्याचे हात बांधून पोलिसांच्या मदतीने तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित तरुणाची तातडीने वैद्यकीय तपासणी सुरू आहे. प्रशासनाकडून पुढील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


