सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलातील हवालदार सचिन लावंड (रा. दरूज, ता. खटाव) यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली असली, तरी निधनाच्या काही तास आधीच त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवलेला संदेश सहकाऱ्यांसह परिचितांना चटका लावून गेला.
लावंड यांनी स्वतःच्या फोटोसह ‘सावडणे विधी ४/१२/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता आहे’ असा मजकूर स्टेटसवर पोस्ट केला होता. हे स्टेटस पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये चिंता पसरली. चौकशीअंती त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली सातारा पोलीस मुख्यालयातून पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली होती. नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच त्यांना प्रकृती बिघडल्याने रजा घ्यावी लागली. रजेच्या काळात त्यांना काविळ झाल्याचे निदान झाले. काविळ तीव्र स्वरूपात पसरत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सचिन लावंड यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचा अधिकारी गमावल्याने पोलिस दलात शोककळा पसरली आहे. विशेषतः त्यांच्या मृत्यूपूर्वी टाकलेल्या स्टेटसने अनेकांना अंतर्मुख केलं असून, यामागील वेदना आणि मन:स्थितीबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत.


