सातारा प्रतिनिधी
सातारा : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (आरटीओ) जप्त, दंडित तसेच चोरीची वाहने मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने प्रशासनापुढे जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालयाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहन ठेवण्यासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असून सध्या सुमारे १७० वाहने कार्यालय परिसरात धुळखात पडून आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनमालकांनी थकीत दंड भरून आपली वाहने तात्काळ घेऊन जावीत, अन्यथा नियमांनुसार या वाहनांचा लिलाव केला जाईल, अशा आशयाच्या नोटिसा आरटीओकडून पाठवण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड आणि फलटण अशी प्रादेशिक परिवहन विभागाची तीन कार्यालये असून, या तिन्ही ठिकाणी आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी कार्यालयांच्या उपलब्ध जागेत कारवाईदरम्यान पकडलेली, जप्त केलेली, दंड न भरल्याने ताब्यात घेतलेली तसेच चोरीची वाहने ठेवण्यात आली आहेत.
ही वाहने जागा अडवून ठेवत असल्याने कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच नियमित कामकाजासाठी येणाऱ्यांना वाहन पार्किंगसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनमालकांनी आपली वाहने परत घ्यावीत, यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघोले यांच्या निर्देशानुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आरटीओकडे सध्या असलेल्या १७० वाहनांपैकी काही वाहने अनेक वर्षांपासून तिथेच पडून आहेत, तर काही अलीकडेच जप्त करण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचा नियमानुसार लिलाव करण्यापूर्वी एकूण ४५० वाहनमालकांना दंड भरून वाहने ताब्यात घेण्याची अंतिम सूचना देण्यात आली आहे. मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


