सातारा प्रतिनिधी
सातारा शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा डोके वर काढले असून, एका दिवसात तीन वृद्ध महिलांना फसवून सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिस असल्याचे भासवून विश्वास संपादन करत हातचलाखीने दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास कमानी हौद परिसरात मंगल सदानंद वंजारी (वय ६६, रा. गुरुवार पेठ) यांना दोन अज्ञात व्यक्तींनी अडवले. आम्ही पोलीस असल्याचे सांगत त्यांनी वंजारी यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले.
याच दिवशी सोमवार व शनिवार पेठ परिसरातही अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या. पोलिस असल्याचे सांगत वृद्ध महिलांच्या सोन्याच्या बांगड्या व मंगळसूत्र असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज हातोहात लंपास करण्यात आला.
भरदिवसा घडणाऱ्या या घटनांमुळे तोतया पोलिसांची टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वृद्धांनी एकटे प्रवास करताना गरजेपेक्षा अधिक पैसे जवळ ठेवू नयेत, दागिने परिधान करून बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या सूचनांकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वयामुळे कमी दृष्टी, हालचालींवर मर्यादा या बाबींचा गैरफायदा तोतया पोलिस घेत असल्याचे चित्र आहे.
पोलीस दागिने किंवा पैसे मागतात का?
‘पोलीस’ हे नाव ऐकताच अनेक नागरिक विश्वास ठेवतात. या विश्वासाचाच गैरवापर करून तोतया पोलिस वृद्धांना गंडा घालत आहेत. प्रत्यक्षात, पोलीस कधीही दागिने किंवा पैसे मागत नाहीत. ही बाब लक्षात ठेवून नागरिकांनी सतर्क राहावे व अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे


