सातारा | प्रतिनिधी
कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावात पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेवडी येथील महसूल गट क्रमांक ३१९ मध्ये प्रस्तावित असलेल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असतानाच, याच गायरान जमिनीवर पारधी समाजाकडून बेकायदेशीर वास्तव्यास सुरुवात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित समाजाचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सध्या ७० ते ८० पारधी समाजातील व्यक्ती गायरान जमिनीवर राहत असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी येथे केवळ एकच कुटुंब होते. कोणतीही अधिकृत नोंद नसताना लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रेवडी गावातील यात्रेदरम्यान ‘जंपिंग झपांग’ लावण्यावरून झालेल्या वादानंतर गावातील तीन युवकांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरपंच व पोलीस पाटील यांच्या मुलाचाही समावेश आहे. हा गुन्हा खोटा असून, आणखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पारधी समाजाकडून प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचा दावा आहे की, गायरान जमिनीवर घरकुल मंजूर करून द्यावे, अन्यथा गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, यापूर्वी मुंबईचे तत्कालीन आयुक्त यांनी ही मागणी फेटाळून लावत ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय दिला होता. त्या निर्णयाचा राग धरून गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. शेतमाल चोरी, तसेच उसतोड मजूर गावात येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याच परिसरातून सातारा स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली.
या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रेवडी ग्रामस्थांच्या वतीने ॲड. वैभव मोरे पाटील यांनी सांगितले की, “गावातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही युवक पोलीस भरतीची तयारी करत असून, अशा केसेसमुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी, मात्र निरपराध युवकांवरील खोटे गुन्हे थांबवावेत.”
या संपूर्ण प्रकरणामुळे रेवडी गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


