नवी दिल्ली वृत्तसंस्था
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत आगमनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित राहतील, याची कल्पनाही आम्हाला नव्हती, अशी प्रतिक्रिया रशियाच्या राष्ट्रपती भवन ‘क्रेमलिन’कडून व्यक्त करण्यात आली. “या बाबत आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करताना आनंद झाला. आज संध्याकाळी आणि उद्याच्या आपल्या संवादाची अपेक्षा आहे. भारत-रशिया मैत्री ही काळाच्या कसोटीवर उतरलेली आहे आणि तिचा आपल्या लोकांना खूप फायदा झाला आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले.#IndiaRussia… https://t.co/6utvO3vCOv
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 4, 2025
पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, ऊर्जा सुरक्षेपासून ते एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीपर्यंत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणार आहे. यासह व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही महत्त्वाचे करार अंतिम टप्प्यात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी पुतिन भारतात दाखल होताच पंतप्रधान मोदी यांनी पालम विमानतळावर उबदार स्वागत केले. विमानातून उतरतानाच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि गळाभेटही घेतली. त्यानंतर दोघेही एका SUV टॉयोटा फॉर्च्युनर (MH 01 EN 5795) मधून पंतप्रधान निवासस्थानाकडे रवाना झाले. तीन महिन्यांपूर्वी शांघाय शिखर संमेलनातही दोघांनी एकाच वाहनातून प्रवास केला होता.
डिसेंबर 2021 नंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर बदललेल्या आंतरराष्ट्रीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
भारत-रशिया व्यापार संबंधही अलीकडच्या वर्षांत मोठ्या वेगाने वाढले आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 च्या अंदाजानुसार दोन्ही देशांमधील व्यापार तब्बल 68 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. कच्चे तेल, खतं, खनिजं, मौल्यवान दगड, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि संरक्षण क्षेत्रातील व्यवहार या संबंधांना नवी उंची देत आहेत. अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर या दोन देशांची जवळीक अधिक दृढ झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
भारत-रशिया व्यापाराची परंपरा अत्यंत जुनी. 16व्या शतकात दोन्ही देशांमध्ये व्यापाराला प्रारंभ झाला. रशियाने भारताकडे सर्वप्रथम मसाले आणि आलिशान कापडांची मागणी केली होती. या व्यापारातूनच दोन्ही देशांमध्ये विश्वास आणि मैत्रीची पायाभरणी झाली. त्याच संबंधांचे आधुनिक रूप आज 68 अब्ज डॉलरच्या व्यापारात दिसून येते.
पुतिन यांच्या या दौऱ्यात संरक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारत-रशिया भागीदारी कशी नवी दिशा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


