नवी दिल्ली वृत्तसंस्था
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून त्यांच्या मुक्कामासाठी राजधानीतील प्रतिष्ठित आयटीसी मौर्य हॉटेल सज्ज झाले आहे. परदेशी राष्ट्रप्रमुखांचे आतिथ्य करण्यासाठी ओळखले जाणारे हे हॉटेल पुतिन यांचे आधीही स्वागत करीत आले आहे. यावेळीही त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था हॉटेलमधील सर्वात शाही आणि सुरक्षित ‘चाणक्य सूट’ मध्ये करण्यात आली आहे.
४०० खोल्या आरक्षित, सुरक्षा चोख
पुतिन यांच्या भेटीदरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोकॉल यांचा मोठा तगडा प्रारूप आखण्यात आला आहे. रशियन प्रतिनिधी मंडळासाठी हॉटेलमधील तब्बल ४०० खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून ४ आणि ५ डिसेंबर रोजी सर्वसामान्य पर्यटकांसाठी येथे बुकिंग उपलब्ध नाही. राष्ट्रप्रमुखांच्या गरजेनुसार हॉटेल परिसरात तगडी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
शाही ‘चाणक्य सूट’ : लक्झरी आणि भारतीय कलांचा अनोखा संगम
हॉटेलच्या १४व्या मजल्यावरील ४,६०० चौरस फुटांचे ‘ग्रँड प्रेसिडेन्शियल चाणक्य सूट’ हे भारतीय परंपरा, कलासंस्कृती आणि आधुनिक सुसज्जतेचा अप्रतिम मेळ साधते.
यामध्ये
• भव्य कॉरिडॉर
• शाही बैठक कक्ष
• अभ्यासिका
• खाजगी डायनिंग एरिया
• मिनी स्पा
• पर्सनल जिम
अशी आकर्षक सुविधा देण्यात आली आहे. अझीझ आणि तय्यब मेहता यांसारख्या प्रख्यात कलाकारांच्या कलाकृतींनी सजलेला हा सूट आपल्या नावाला शोभेल असा अद्वितीय राजेशाही अनुभव देतो.
किंमत किती?
मीडिया अहवालांनुसार, या अत्यंत सुरक्षित आणि आलिशान सूटमध्ये राहण्यासाठी प्रति रात्र ८ ते १० लाख रुपये एवढा खर्च येतो. तर प्रतिनिधी मंडळासाठी आरक्षित करण्यात आलेल्या साध्या खोल्यांची किंमत सुमारे २५ ते २६ हजार रुपये इतकी आहे.
जागतिक नेत्यांची आवडती निवड
आयटीसी मौर्यचा ‘चाणक्य सूट’ हा जागतिक नेत्यांचा आवडता मुक्काम म्हणून प्रसिद्ध आहे.
जी-२० परिषदेदरम्यान जो बायडेन यांनी याच सूटमध्ये मुक्काम केला होता. त्याआधी जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांसारखे अमेरिकेचे माजी अध्यक्षही येथे राहिले आहेत.
दलाई लामा यांनी तर या सूटमधून अनुभवलेल्या ‘सकारात्मक ऊर्जेचा’ खास उल्लेख केला होता.
राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि उच्चस्तरीय गोपनीयतेचे साक्षीदार असलेला ‘चाणक्य सूट’ पुतिन यांच्या दौऱ्यामुळे आणखी एक महत्त्वाची नोंद आपल्या शाही परंपरेत जोडत आहे.


