सातारा प्रतिनिधी
माण तालुक्यातील श्री क्षेत्र मलवडी येथील श्री खंडोबाचा पारंपरिक रथोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळपासूनच परिसर भंडाऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघाला होता. ‘येळकोट येळकोट जयमल्हार’, ‘लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने संपूर्ण मलवडी दुमदुमून गेली.
पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. शिस्तबद्ध रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले. ठरलेल्या विधीनुसार दुपारी १२.२० वा. पहिला शेडा, १२.३० वा. दुसरा शेडा व त्यानंतर तिसरा शेडा होऊन धुपारती झाली. त्यानंतर मानकरी, सालकरी, पुजारी व वाघे यांच्या उपस्थितीत ‘श्रीं’चे मुखवटे रथावर नेण्याचा सोहळा पार पडला. या वेळी झालेल्या भंडाऱ्याच्या उधळणीने वातावरण भक्तिमय झाले.
यानंतर महंत शांतीगिरिजी महाराज यांच्या हस्ते रथपूजन झाले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सोनिया गोरे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपस्थित होते. देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे आणि पाच कोटी रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेप्रसंगी मंत्री गोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वांजोळी (ता. खटाव) येथील शशिकांत मगर यांनी अठरा लाख रुपयांच्या खर्चातून लाकडी सभामंडपाचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
रथाच्या ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात होताच परिसरात नवीन जोश संचारला. काही अंतर गेल्यावर माता महालक्ष्मीचा रथही माणगंगेच्या पात्रातून निघालेल्या या प्रदक्षिणेत सहभागी झाला. देवाची घोडी, सनई-हलगी ताफे, वाद्यवृंद यांच्या गजरात निढळ, नवलेवाडी आणि मलवडी येथील सासनकाठ्या नाचविण्यासाठी तरुणांनी मोठी चढाओढ दाखवली. दोन्ही रथांवर देणग्या आणि नोटांच्या माळांचा वर्षाव सुरू होता.
मेवा-मिठाई, खेळणी, पाळणे अशा दुकानांनी यात्रा परिसर गजबजला. पाळण्यांसाठी बालकांपासून तरुणांपर्यंत सर्वच जणांची भाऊगर्दी होती. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहीर यांनीही रथदर्शनासाठी उपस्थिती लावली.
अखेर संपूर्ण गाव आणि माणगंगेच्या पात्रातून होत रथांची ग्रामप्रदक्षिणा सायंकाळी निर्विघ्नपणे पूर्ण झाली.


