सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा नगरपालिकेच्या पाठीमागील गेटसमोर गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघाताने परिसरात एकच गोंधळ उडाला. बोगदा रोडवरून येणाऱ्या एका कारने पालिकेसमोर उभ्या असलेल्या दोन कारना जोरदार धडक दिली. धडक बसलेल्या दोनही कार निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात इतका भीषण होता की क्षणभरातच रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. धडक देणाऱ्या कारमध्ये एक युवक वाहन चालवत होता. अपघातात तो जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर काही वेळातच जागेवर बघ्यांची गर्दी झाली. शाहू चौक ते बोगदा रोड या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद प्रक्रिया सुरू होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


