सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. पत्नीच्या प्रसूतीसाठी रजेवर गावी आलेले भारतीय सैन्यातील जवान प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला. पित्याच्या निधनानंतर केवळ आठ तासांनी जन्मलेल्या या चिमुकलीने आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेतल्याचा प्रसंग उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
महाराष्ट्राचं ह्रदय पिळवटणारा व्हिडीओ, पत्नीच्या डिलीव्हरीसाठी आलेल्या जवानाचा मृत्यू, माय-लेकीने स्ट्रेचरवरुन घेतलं अंत्यदर्शन pic.twitter.com/NRGJFZVjx5
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) January 11, 2026
सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात झालेल्या अपघातात जवान प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी अंत झाला. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन ते गावी आले होते. घरात आनंदाचे क्षण नांदणार होते; मात्र नियतीने वेगळाच घात केला. एका अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर काही तासांतच प्रमोद जाधव यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. एकीकडे नवजात कन्येच्या आगमनाचा आनंद आणि दुसरीकडे पतीच्या निधनाचे असह्य दुःख
या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी सहन कराव्या लागल्या. त्यानंतर दरे तर्फ परळी या त्यांच्या मूळ गावी प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यदर्शनाचा क्षण काळीज पिळवटून टाकणारा
अंत्यसंस्कारावेळी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून पत्नी आणि अवघ्या आठ तासांची चिमुकली लेक अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. पित्याच्या पार्थिवावर फुले अर्पण करताना आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप हा प्रसंग उपस्थित सर्वांनाच हादरवून गेला. संपूर्ण गाव या दृश्याने स्तब्ध झाले.
या प्रसंगाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशसेवेसाठी झटणाऱ्या जवानांच्या कुटुंबावर अशी दुर्दैवी वेळ येऊ नये, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गावकरी, स्थानिक प्रशासन तसेच सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे वीर जवान प्रमोद जाधव आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कन्येच्या रूपाने त्यांची आठवण कायम जिवंत राहणार आहे.


