सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीनंतर आज उशिरा संध्याकाळी अंतिम यादी जाहीर झाली. प्रशासकीय प्रक्रियेत झालेल्या विलंबानंतर ही यादी समोर आली असून, प्रभाग क्रमांक २० मध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपच्या आशा पंडित यांचाच एकमेव अर्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे छाननीत अर्ज वैध ठरल्यास त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांत प्रदीर्घ चर्चेनंतर उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. नगराध्यक्षपदासह ५० नगरसेवक पदांसाठी उमेदवार अंतिम केल्यानंतर दूरध्वनीद्वारे निवड झालेल्यांना अर्ज भरायला सांगण्यात आले.
मात्र, उमेदवार यादी जाहीर होताच दोन्ही ‘राजे’ गटात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला. निवड प्रक्रियेत स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत दोन्ही गटांसह भाजपच्या तब्बल ५० पेक्षा जास्त इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. आज अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर ही बंडखोरी स्पष्टपणे पृष्ठभागावर आली.
या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार (२१ नोव्हेंबर)पर्यंत असल्याने, नाराज कार्यकर्त्यांना पटवून अर्ज मागे घेण्यासाठी दोन्ही गटांना आणि भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. मनोमिलनाच्या उमेदवारांवर बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षीय पातळीवरील संभाषणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, विविध प्रभागांमध्ये उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे गट आणि भाजपमधील बंडखोरांची संख्या लक्षणीय असून, अनेक प्रभागांत एकाच गटातील एकापेक्षा जास्त दावेदार रिंगणात असल्याचे दिसून आले. त्यामुळे सातारा पालिका निवडणुकीतील भाजपची स्थिती गुंतागुंतीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.


