जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरटीओ तपासणीपासून वाचण्यासाठी गाडी वेगाने वळवणाऱ्या चालकाने कारवरील नियंत्रण गमावले आणि कार दुभाजकावर आदळली. काही क्षणांतच कारला आग लागली आणि यात सहा महिन्यांच्या गर्भवती जान्हवी मोरे (वय २६) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. पती संग्राम मोरे यांच्या डोळ्यांसमोर हा हृदयद्रावक प्रसंग घडला.
• दुभाजकाला धडक… आणि काही क्षणांत कार पेटली
मिळालेल्या माहितीनुसार, मोरे दांपत्य माहरघराहून परतत असताना हा अपघात घडला. महामार्गावर आरटीओकडून वाहन तपासणी सुरू होती. संग्राम मोरे हे कार चालवत होते. परंतु त्यांच्या जवळ वैध ड्रायव्हिंग परवाना नव्हता. पोलिस तपासणी टाळण्यासाठी त्यांनी अचानक गाडी वळवली. गाडी वेगात असल्याने ती थेट महामार्गावरील दुभाजकावर जाऊन धडकली. धक्क्यानंतर इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला.
• पोलिस व नागरिकांची धाव; मात्र… उशीर झाला!
अपघातानंतर पोलिस आणि महामार्गावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काच फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढले. पण धुराने संपूर्ण गाडी व्यापल्याने आत अजून एक व्यक्ती आहे, हे त्यांना लक्षात आले नाही. काही क्षणांतच गाडीने पेट घेतला आणि आत अडकलेल्या जान्हवी मोरे या होरपळून मृत्युमुखी पडल्या.
जान्हवी या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा आणि अजन्म्या बाळाचा अंत झाला. हा प्रसंग पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.
परिसरात हळहळ; नागरिकांमध्ये संताप
या घटनेने जामनेर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने आणि आरटीओ कारवाईच्या भीतीने जीवघेणा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर महामार्गावर योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गाडी लॉक झाली तर काय करावे?
वाहन अपघातानंतर गाडी लॉक झाल्यास आत अडकलेल्या व्यक्तीने तातडीने काच फोडण्याचा प्रयत्न करावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
गाडीतील हॅमर, टॉमी किंवा धारदार वस्तूचा वापर करून समोरील किंवा मागील काच फोडावी.
समोरची काच मोठी असल्याने त्यातून बाहेर पडणे सोपे असते.
बाहेरून मदत करणाऱ्यांनी प्रथम धूर कमी होण्यासाठी गाडीचे दरवाजे उघडण्याचा किंवा काच फोडण्याचा प्रयत्न करावा.
या दुर्घटनेनंतर “आरटीओच्या तपासणीपासून बचाव करण्यासाठी जीव धोक्यात घालण्यापेक्षा नियमांचं पालन करा,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी जामनेर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


