जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून मित्रानेच दुसऱ्या मित्राच्या मदतीने तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून जंगलातील तलावात फेकल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
निलेश राजेंद्र कासार (वय २७, रा. दत्त चैतन्य नगर, जामनेर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. १५ डिसेंबर रोजी निलेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी जामनेर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी शोधमोहीम राबवित असताना शिरसोली गावाजवळील रामदेववाडी परिसरात निलेशची दुचाकी आढळून आली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे निलेशचा मित्र दिनेश चौधरी आणि त्याचा सहकारी भूषण पाटील यांच्यावर संशय बळावला. दोघांचेही मोबाईल बंद असून ते गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
एमआयडीसी पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन दिनेश चौधरी आणि भूषण पाटील या दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्यांनी निलेश कासारची हत्या केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी निलेश आणि दिनेश यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हत्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रामदेववाडी जंगलातील तलावात टाकण्यात आला होता. पोलिसांनी शोध घेऊन तलावातून मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिनेश चौधरी आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


