सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले असून, उपद्रवी आणि गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील पोलिस ठाण्यांना, स्थानिक स्तरावर उपद्रवी प्रवृत्तीच्या व्यक्तींची तसेच पोलिस नोंदीवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता असून, शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन सुरू आहे.
निवडणुकांना न्यायालयीन हिरवा कंदील
गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राज सुरू होते. निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधींच्या जागी प्रशासकीय अधिकारी कारभार पाहत होते. याविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. परिणामी, रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लाभला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी स्पष्ट होईल. दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. अल्पावधीत उमेदवार ठरवणे, बंडखोरांची मनधरणी आणि प्रचारयोजना ठरवताना राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड अनिवार्य
निवडणूक काळात भांडणे, गोंधळ किंवा दहशतीचे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच कंबर कसली आहे. मागील निवडणुकांदरम्यान गुन्हे दाखल असलेल्यांवर ‘चांगल्या वर्तणुकीची हमी’ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर कोणत्याही उपद्रवाला आळा बसावा, हा हेतू पोलिसांचा आहे.
तडीपारीचे प्रस्ताव तयार
निवडणूक व मतमोजणीदरम्यान मतदारांवर दबाव येऊ नये म्हणून संभाव्य उपद्रवींवर तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. मतदानकाळात अशा व्यक्तींना पालिका हद्दीबाहेर ठेवण्याचे नियोजन स्थानिक पोलिसांकडून करण्यात येणार आहे. संबंधित प्रस्ताव पुढील काही दिवसांत उपअधीक्षकांकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून, “शांतता राखा, मतदान करा” हा संदेश जिल्हाभर पोहोचवण्याच्या तयारीत साताऱ्याचे पोलीस आहेत.


