
मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळताच राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकांचे वारे लागतानाच आरोप-प्रत्यारोपांची मालिका पुन्हा रंगू लागली असताना, आज सोमवारी भाजपकडून होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार एक ‘महत्वाचा खुलासा’ करणार असल्याची चर्चा असून, त्यावरून सत्ता व विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे.
विविध माध्यमांतून सूत्रांच्या हवाल्याने दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ही पत्रकार परिषद मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीने अलीकडेच राजकीय शक्तीप्रदर्शन करत मतदारयादीतील तफावतींवर सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मार्ग काढत सरकारवर थेट हल्ला चढवला, तर शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि शेतकरी संघटनांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले.
मतदारयादीतील गोंधळ, निवडणुका पुढे ढकला, आघाडीची मागणी
विरोधकांची ठाम भूमिका अशी की, मतदारयादीतील घोळ दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या भाजपाच्या पत्रकार परिषदेत नेमके काय समोर येणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या आरोपांवर शेलार नेमका कसा प्रत्युत्तर देतील, हा प्रश्नही सर्वांच्या मनात आहे.
निवडणुकांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ‘राजकीय भूकंप’ घडवणारा ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


