
अकोला प्रतिनिधी
बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्याकांडाची सुनावणी आता निर्णायक वळणावर आली आहे. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि समाजसेवक असलेल्या हुंडीवाले यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अंतिम युक्तिवादास उद्या सोमवारपासून (३ नोव्हेंबर २०२५) अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात होणार आहे.
या प्रकरणात राज्य सरकारने विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त केलेले ॲड. उज्ज्वल निकम सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणार असून, त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. राजेश्वर देशपांडे आणि ॲड. नरेंद्र धूत सहाय्य करणार आहेत. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी बी. कचरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
कौलखेड येथील एका शैक्षणिक संस्थेसंदर्भात हुंडीवाले यांचा गावंडे कुटुंबाशी वाद उफाळून आला होता. पुढे तो वाद चिघळत जाऊन एका धर्मार्थ संस्थेच्या कार्यालयात त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील गंभीरता आणि समाजात निर्माण झालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निकम यांची विशेष नियुक्ती केली.
न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमध्ये हत्येत वापरण्यात आलेली लोखंडी खुर्चीचे ३२ तुकडे, अग्निशामक सिलिंडर तसेच लोखंडी कुदळ यांचा समावेश आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दोन दिवस साक्ष देत महत्त्वपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडली.
या प्रकरणात सरकारी पक्षाने अतिरिक्त आरोपपत्र सादर केले होते. बचाव पक्षाने त्यावर आक्षेप घेतला असला, तरी ॲड. निकम यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सायटेशनचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला आणि अखेर न्यायालयाने अतिरिक्त आरोपपत्र ग्राह्य धरले.
साक्षींची महत्त्वपूर्ण साक्ष, पुरावे आणि सरकारी पक्षाचा दमदार युक्तिवाद यानंतर आता सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या निर्णायक युक्तिवादाकडे जिल्ह्यातील तसेच संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


