
बार्शी प्रतिनिधी
खासगी सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बार्शी नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात सावकारांविरोधात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेने नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये भिती आणि संतापाचे वातावरण आहे.
गणेश गोविंद बनसोडे (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी वैशाली बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे.
वेतनातील अनियमितता, घरखर्चासाठी सावकारांकडून कर्ज
गणेश बनसोडे हे दहा वर्षांपासून बार्शी नगरपरिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. वेतन कमी असूनही वेळेवर पगार न मिळाल्याने त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. पण गेल्या काही महिन्यांपासून सावकारांनी अत्यंत अमानुष पद्धतीने पैसा परतफेडीसाठी दबाव आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गणेश आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देत शिवीगाळ करून, कामाच्या ठिकाणी गोंधळ घालण्याची, हातपाय मोडण्याची, तसेच महिलांकडून खोटा छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सात संशयितांवर गुन्हा
निलेश खुडे, प्रशांत माने, विशाल गुगळे, अतुल कांबळे, संगिता पवार, सचिन सोनवणे आणि संतोष कळमकर या सात जणांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चार चिट्ठ्या, मानसिक छळाचा उल्लेख
घटनास्थळी पोलिसांना गणेश यांनी लिहिलेल्या चार चिट्ठ्या मिळाल्या असून, त्यात सावकारांच्या छळाचा स्पष्ट उल्लेख आहे. “सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे,” असे लेखी नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहेरी असताना पत्नीला धक्कादायक बातमी
घटनेच्या वेळी पत्नी आणि मुले दिवाळीनिमित्त सोलापूर येथे गेले होते. शुक्रवारी सकाळी शितल खलसे यांनी फोन करून ही बाब पत्नीला कळवली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आढळताच नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.
या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर तपास करीत आहेत.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून योग्य वेळी वेतन न मिळणे आणि कर्जबाजारीपणामुळे निर्माण होत असलेल्या मानवी संकटाचा मुद्दा या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.


