अंबरनाथ प्रतिनिधी
अंबरनाथमधील एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पती विश्वंभर शिंदे यांनी खलबत्त्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी घरातच झालेल्या या हल्ल्यात डॉ. शिंदे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बदलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना बुधवारी सकाळी घडली. रियाज सुरू करण्यापूर्वी डॉ. किरण शिंदे या पतीसाठी चहा बनवत असताना त्यांच्या पतीने अचानक किचनमध्ये येत त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने प्रहार केला, तसेच त्यांचा गळादेखील दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या किंकाळ्या ऐकून मुलांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि आईचा जीव वाचवला.
हल्ल्यानंतर डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात, “एका बालमित्राने ‘नाईस डीपी’ असा मेसेज पाठवला होता. त्यावरून पतीने संशयातून हल्ला केला,” असा खुलासा केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी पतीला तातडीने अटक करण्याची मागणी जखमी डॉक्टरांनी केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध महिला डॉक्टरवरच घरगुती हिंसाचाराचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता आरोपी पतीवर कारवाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे.


