वृत्तसंस्था
जगभरातील अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मंदीचे सावट दिसू लागले असून त्याचा सर्वाधिक फटका आयटीसह विविध उद्योग क्षेत्रांना बसत आहे. अमेरिकेसह युरोप, आशियातील मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीचे सत्र सुरू केले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खर्चकपात आणि बदलती व्यवसाय धोरणे या पार्श्वभूमीवर जगातील 15 आघाडीच्या कंपन्या मिळून तब्बल 1 लाख 70 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या यादीत सर्वाधिक कपात ‘युनायटेड पार्सल सर्व्हिस’ (UPS) कडून करण्यात येणार असून तब्बल 48,000 कर्मचाऱ्यांचे करार समाप्त होणार आहेत. तर अमेझॉनकडून सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिपनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज इंटेलमधून 24,000 कर्मचाऱ्यांची कपात जाहीर करण्यात आली आहे. या प्रचंड कपातीमुळे सेमीकंडक्टर उद्योगासमोरील आव्हानेही स्पष्ट झाली आहेत.
आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर केवळ तंत्रज्ञान क्षेत्रच नव्हे तर उत्पादन, किरकोळ विक्री, सल्लागार तसेच आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपाती होत आहेत. नेस्लेने जागतिक स्तरावर 16,000 नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सल्लागार क्षेत्रातील दिग्गज एक्सेंचरने 11,000 कर्मचारी कपात जाहीर केली आहे. पीडब्ल्यूसीनेही 5,600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रालाही याचे मोठे पडसाद उमटत असून फोर्डकडून 11,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. आरोग्यसेवा कंपनी नोवो नॉर्डिस्कमध्ये 9,000, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टमध्ये 7,000 कर्मचाऱ्यांची कपात जाहीर झाली आहे.
‘एआयचा वाढता प्रभाव’
उद्योगतज्ज्ञांच्या मते, ही कपात केवळ खर्चकपातीचा परिणाम नसून ऑटोमेशन, एआय आणि नवीन व्यवसाय मॉडेल्सकडे कंपन्यांचा वेगाने होत असलेला कल हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. मात्र, या मोठ्या कपातीमुळे लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कंपन्यांतील कपातीचा तपशील
* कंपनी कपात
यूपीएस 48,000
अमेझॉन 30,000 पर्यंत
इंटेल 24,000
नेस्ले 16,000
एक्सेंचर 11,000
फोर्ड 11,000
नोवो नॉर्डिस्क 9,000
मायक्रोसॉफ्ट 7,000
पीडब्ल्यूसी 5,600
सेल्सफोर्स 4,000
पॅरामाउंट 2,000
लक्ष्य (Target) 1,800
क्रोगर 1,000
अप्लाइड मटेरियल्स 1,444
मेटा (फेसबुक) 600
या मोठ्या प्रमाणातील कपातीमुळे जागतिक रोजगार बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून आगामी काळात या संकटाचा प्रभाव आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. व्यवसायजगतात एआयचा वाढता वापर आणि डिजिटल रूपांतरणामुळे पारंपरिक नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असून रोजगाराच्या नव्या समीकरणाचे संकेत मिळत आहेत.


