मुंबई प्रतिनिधी
देशातील तसेच आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तासंघर्ष तीव्र झाला असला, तरी मतदानोत्तर चाचण्यांचे चित्र साधारणपणे एकसमान असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध सहा प्रमुख ‘एक्झिट पोल’नुसार भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ११४ जागांचा ‘जादुई आकडा’ भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती आरामात पार करेल, असा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. काही सर्वेक्षणांमध्ये या युतीला १४० पेक्षा अधिक जागा मिळण्याचीही शक्यता दाखवण्यात आली आहे.
ठाकरे गटाला धक्का, काँग्रेसची मर्यादित कामगिरी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची आघाडी २०१७ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता या चाचण्यांतून समोर येत आहे. बहुतांश अंदाजांनुसार या आघाडीला ५८ ते ८३ जागांदरम्यान समाधान मानावे लागू शकते.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीबाबत मतमतांतरे असली, तरी काँग्रेस आपली पारंपरिक मर्यादित मतदारसंख्या टिकवून ठेवेल, असा कयास आहे. काही सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस आघाडीला २० पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
सहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
Axis My India
भाजप–शिवसेना (शिंदे) : १३१–१५१
उबाठा–मनसे : ५८–६८
काँग्रेस–वंचित : १२–१६
इतर : ६–१२
JVC Exit Poll
भाजप–शिवसेना : १३८
उबाठा–मनसे : ५९
काँग्रेस–वंचित : २३
इतर : ७
DV Research
भाजप–शिवसेना : १०७–१२२
उबाठा–मनसे : ६८–८३
काँग्रेस–वंचित : १८–२५
इतर : १०–१९
Janmat Exit Poll
भाजप–शिवसेना : १३८
उबाठा–मनसे : ६२
काँग्रेस–वंचित : २०
इतर : ७
सकाळ Exit Poll
भाजप–शिवसेना : १२२
उबाठा–मनसे : ७५
इतर : २०
Times Network Exit Poll
भाजप–शिवसेना : १४२
उबाठा–मनसे : ५८
इतर : २७
निकालाकडे लक्ष
मतदानोत्तर चाचण्यांमधील फरक असूनही, मुंबई महापालिकेच्या सत्तेवर भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचाच वरचष्मा राहील, असे संकेत मिळत आहेत. मात्र, अंतिम चित्र अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होणार असून, त्याकडे सर्व राजकीय पक्षांसह मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.


