नवी दिल्ली वृत्तसंस्था
अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकार मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वात गरीब घटकांना मोफत धान्य देण्यासाठी सुरू असलेल्या अंत्योदय अन्न योजनेत आता धान्य वाटपाच्या पद्धतीत सुधारणा होणार आहे. या बदलामुळे धान्य वितरणातील विषमता दूर होणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार धान्य मिळणार आहे.
सध्या अंत्योदय कार्डधारक कुटुंबांना सदस्यसंख्या कितीही असो, दरमहा ३५ किलो धान्य ‘प्रति कुटुंब’ या पद्धतीने दिले जाते. म्हणजेच दोन सदस्यांच्या कुटुंबालाही ३५ किलोच आणि सात सदस्यांच्या कुटुंबालाही ३५ किलोच धान्य मिळते. त्यामुळे मोठ्या कुटुंबांना धान्य अपुरे पडत होते, तर लहान कुटुंबांना गरजेपेक्षा अधिक धान्य मिळत होते.
हीच असमानता दूर करण्यासाठी आता सरकारने ‘प्रति व्यक्ती ७.५ किलो’ धान्य देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्यापेक्षा कमी धान्य मिळू शकते. तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना अधिक धान्य मिळणार आहे.
अन्न मंत्रालयाकडून याबाबतचा अहवाल समोर आला आहे. नवीन प्रणाली पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्णपणे लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात सध्या जवळपास १.७१ कोटी अंत्योदय कार्डधारक कुटुंबे असून त्यांत मोठ्या संख्येने पाचपेक्षा कमी सदस्य असलेली कुटुंबे आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे सरकारचे धान्य मोठ्या प्रमाणावर बचत होईल आणि ते योग्य व गरजूंपर्यंत पोहोचेल, असा दावा करण्यात येत आहे.
सध्या साध्या रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. मात्र अंत्योदय कार्डधारकांसाठी प्रतिव्यक्ती साडेसात किलो धान्य मिळणार असल्याने मोठ्या कुटुंबांना या निर्णयाचा फायदा अपेक्षित आहे.
सरकारने केलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे रेशन योजनेत पारदर्शकता व न्याय्य वाटपाचा मार्ग मोकळा होणार असून सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यावर लाभार्थ्यांच्या जीवनात नेमका काय बदल होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


