नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने अखेर ८ व्या वेतन आयोगाच्या पुढील टप्प्याला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे सुमारे ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला (ToR) मंजुरी दिली असून, यामुळे पगारवाढीची प्रक्रिया आता औपचारिकरित्या सुरू झाली आहे.
* काय आहे ८वा वेतन आयोग?
दर दहा वर्षांनी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वेतन आयोग स्थापन करते.
२०१६ पासून ७वा वेतन आयोग लागू असल्याने, ८वा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
* पगारवाढीचा आधार, ‘फिटमेंट फॅक्टर
या आयोगासाठी २.४६ फिटमेंट फॅक्टरचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच, ७व्या वेतन आयोगाच्या तुलनेत मूळ पगार जवळपास २.५ पट होऊ शकतो.
उदाहरणार्थ, ‘जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार २५,००० रुपये असेल, तर तो ८व्या वेतन आयोगानंतर सुमारे ६१,५०० रुपये होऊ शकतो.
* अपेक्षित पगार तक्ता
पे लेव्हल ७वा CPC ८वा CPC अपेक्षित
लेव्हल 1 18,000 44,300
लेव्हल 2 19,900 49,000
लेव्हल 3 21,700 53,500
लेव्हल 4 25,500 62,800
लेव्हल 5 29,200 71,900
लेव्हल 6 35,400 87,100
लेव्हल 7 44,900 1,10,600
लेव्हल 8 47,600 1,17,200
लेव्हल 9 53,100 1,30,400
लेव्हल 10 56,100 1,37,800
लेव्हल 11 67,700 1,66,500
लेव्हल 12 78,800 1,93,700
लेव्हल 13 1,23,100 3,02,200
लेव्हल 14 1,44,200 3,54,200
लेव्हल 15 1,82,200 4,48,700
लेव्हल 16 2,05,400 5,05,600
लेव्हल 17 2,25,000 5,53,500
लेव्हल 18 2,50,000 6,15,000
* हे आकडे अंदाजे असून २.४६ फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर तयार करण्यात आले आहेत.
* कोणाला किती फायदा?
लिपिक, गट-ड कर्मचारी आणि कनिष्ठ सहाय्यक — पगार 18,000 वरून सुमारे 44,000 पर्यंत.
सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर दर्जाचे कर्मचारी — पगार ₹44,000 वरून ₹1.1 लाखांपर्यंत.
IAS, IPS आणि उच्चपदस्थ अधिकारी (लेव्हल 13 ते 18), मूळ पगार ₹3 लाखांवरून ₹6 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
* सरकारसमोरची आर्थिक कसरत
८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारवर दरवर्षी १.५ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, कर्मचाऱ्यांच्या हातात जादा पैसा गेल्यामुळे अर्थव्यवस्थेतील खप वाढण्यास मदत होईल, अशीही अपेक्षा आहे.
* केव्हा मिळणार वाढीव पगार?
आयोगाला आपला अंतिम अहवाल १८ महिन्यांच्या आत सादर करायचा आहे. जर प्रक्रिया नियोजनाप्रमाणे पूर्ण झाली, तर जानेवारी २०२६ पासून नवीन पगार लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गरज भासल्यास अंतरिम अहवाल सादर केला जाऊ शकतो.
८व्या वेतन आयोगामुळे केंद्रातील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना, कनिष्ठ लिपिकांपासून ते IAS अधिकाऱ्यांपर्यंत, मोठ्या प्रमाणात पगारवाढ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढणार असला, तरी सरकारसमोर आर्थिक शिस्त राखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.


