नवी दिल्ली वृत्तसंस्था
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय निवडणूक आयोगाने आज (सोमवार) एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. बिहारमध्ये ‘विशेष सघन सुधारणा’ (Special Intensive Revision – SIR) योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता या प्रक्रियेचा दुसरा टप्पा देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानेश कुमार म्हणाले, “छठपूजेच्या निमित्ताने मी बिहारमधील ७.५ कोटी मतदारांना सलाम करतो. बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर देशातील सर्व ३६ राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून आम्ही दुसऱ्या टप्प्याचा आराखडा निश्चित केला आहे.”
या दुसऱ्या टप्प्यात अंदमान-निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे योग्य मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र नावांची वगळणी करणे हा आहे. “मतदार यादीची मॅन्युअल आणि तांत्रिक जुळवणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यावर आधारितच दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे,” असे ते म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांनी पुढे सांगितले की, “एसआयआर प्रक्रियेअंतर्गत दोन महत्त्वाच्या परिषदा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये तांत्रिक प्रगती, अनुभव आणि भविष्यातील दिशानिर्देशांवर सखोल चर्चा झाली. आता दुसऱ्या टप्प्यातील १२ राज्यांमधील मतदार याद्या आज रात्रीपासून गोठवल्या जाणार आहेत.”
सुमारे २१ वर्षांनंतर एसआयआरची अंमलबजावणी पुन्हा सुरू होत असल्याने आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बिहारमधील यशस्वी प्रयोगानंतर आयोगाने देशव्यापी विस्ताराचा निर्णय घेतल्याने निवडणूक व्यवस्थेत ‘डिजिटल सुधारणा’चा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


