नवी दिल्ली वृत्तसंस्था
सोनीपत:राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने सोनीपत हादरलं आहे. न्यायालयात तारखेसाठी जात असताना बापलेकावर गोळ्यांचा वर्षाव करत हल्लेखोरांनी निर्दयपणे त्यांची हत्या केली. दुचाकीला स्कॉर्पिओने धडक देत उडवल्यानंतर जमिनीवर कोसळलेल्या बापलेकावर तब्बल १५ गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, या दुहेरी हत्येमागे पाच वर्षांपूर्वीच्या नितीन सैनी हत्याकांडाचा बदला असल्याचं पोलिस तपासात प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे.
तारखेसाठी निघाले… पण गाठला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मबीर सिंह आणि त्यांचा मुलगा मोहित हे सोमवारी सकाळी सोनीपत न्यायालयात तारखेसाठी निघाले होते. मोहितवर २०२० मध्ये झालेल्या नितीन सैनी हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याच खटल्याच्या सुनावणीसाठी बापलेक दोघं बाईकवरून निघाले. काही अंतरावर धर्मबीरचे वडील बुधरामही सोबत होते, मात्र चौकाजवळ ते उतरले आणि बापलेक पुढे गेले.
स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली
थोड्याच अंतरावरून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने बापलेकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघंही सर्व्हिस रोडवर जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ थांबवून थेट गोळीबार सुरू केला. काही क्षणांतच १५ पेक्षा अधिक गोळ्या झाडल्या गेल्या. मोहितच्या हेल्मेटमधून गोळ्या आरपार गेल्या होत्या, तर धर्मबीरच्या शरीरावर अनेक गोळ्या लागल्या. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
गाडी रेलिंगला अडकली, आरोपींचा पळ
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र स्कॉर्पिओ रेलिंगला धडकली आणि तिचा टायर अडकला. त्यामुळे तिन्ही आरोपी गाडी सोडून पळाले. त्यांनी नंतर एक दुचाकी चोरी करून घटनास्थळावरून पळ काढल्याचं पोलिसांना आढळलं आहे.
“माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही घडलं” बुधराम
धर्मबीरचे वडील बुधराम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना सांगितलं की,
“मी काही अंतरावर उतरलो होतो. त्यानंतर काही सेकंदांतच समोरून आलेल्या स्कॉर्पिओने माझ्या मुलगा आणि नातवाच्या बाईकला धडक दिली. ते जमिनीवर पडताच, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. मी असहाय्यपणे सर्व काही पाहत राहिलो.”
पोलिसांची पाच पथकं सक्रिय
घटनेनंतर सोनीपत पोलिसांनी पाच विशेष पथकं तयार केली आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या नितीन सैनी हत्याकांडाच्या सूडातून करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
थरकाप उडवणारी घटना
या घटनेमुळे सोनीपत परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. भररस्त्यात न्यायालयात जाणाऱ्या बापलेकाला अशा प्रकारे गोळ्यांचा पाऊस पाडत संपवणं, हा पोलिसांसाठीही मोठा आव्हानात्मक प्रसंग ठरला आहे. लोकांमध्ये भीतीचं सावट असून, सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


