अमरावती प्रतिनिधी
राज्यात आत्महत्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा धास्तावून सोडलं आहे. साताऱ्यातील डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनं राज्य हादरलं असतानाच आता अमरावतीतूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडका गावात २१ वर्षीय श्रुती झेले या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्राथमिक माहितीनुसार, श्रुती ही धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. घरात कोणी नसताना तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, श्रुतीने आत्महत्या का केली? तिच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने हा टोकाचा निर्णय घेतला? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. ही आत्महत्या की काही वेगळं कारण यामागे दडलं आहे, याचा तपास अमरावती पोलिसांकडून करण्यात येत आहे.
साताऱ्यानंतर अमरावतीतील या घटनेने राज्यातील युवक-विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


