अमरावती प्रतिनिधी
अमरावतीत राणा दाम्पत्य आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्याने ठाकूर यांनी संताप व्यक्त करत राणा दाम्पत्याला थेट ‘औकातीत राहा’ असा इशारा दिला आहे.
“मी पहिल्यांदा पराभूत झाले असे नाही. मला पराभव-जिंकणं याचं काही वाटत नाही, पण मी पक्ष बदलत नाही, सरड्यासारखे रंग बदलत नाही. ‘भैया-भाभींनी’ आपापल्या औकातीतच राहावं, एवढंच सांगते. पुन्हा अशी भानगड केली, तर मी उत्तर देईल ते लक्षात ठेवा,” असा थेट इशारा ठाकूर यांनी दिला.
ठाकूर पुढे म्हणाल्या, “गेल्या दहा वर्षांत काही ‘विचित्र’ लोक राजकारणात आले आणि त्यांनी अमरावतीचं नाव खराब केलं. राणा दाम्पत्य हलकटपणाची वागणूक देतात. दिवाळीत त्यांनी माझ्या घरी किराणा पाठवून हलकटपणा केला. शाळांमध्ये जे तेल वाटतात, तेच त्या थैलीत होतं. असं पुन्हा केलं, तर योग्य उत्तर मिळेल.”
“मी प्रतिष्ठित घरातील मुलगी आहे. माझ्या वडिलांनी कधी बारदाना चोरला नाही. मी चिल्लर धंदे करत नाही, पण जर तुम्ही असे धंदे करत असाल, तर त्याचं उत्तर देणं मला अवघड नाही,” असेही ठाकूर म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या अडचणींवर भाष्य करताना ठाकूर म्हणाल्या, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे आणि हे लोक त्यांच्या नावावरून राजकीय नाटके करतात. हरामखोरानो, शेतकऱ्यांना मदत करा, पण असा अपमान आम्ही सहन करणार नाही. हे चिल्लर धंदे बंद करा,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.
यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवत, “जनतेच्या भावनांचा अपमान करणाऱ्यांना अमरावतीकर कधीच माफ करणार नाहीत. राणांनी आपली नाटकबाजी थांबवावी, अन्यथा लोकच योग्य जागा दाखवतील,” असा इशारा दिला आहे.
राणा-ठाकूर यांच्यातील या नव्या वादामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, या वादावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


