अमरावती प्रतिनिधी
अमरावती शहराचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले ओला लवकरच अमरावती पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
अरविंद चावरिया यांच्या अचानक बदलीमागील कारणांबाबत शहरात चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे. गेल्या काही काळात अमरावतीत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत असून, या पार्श्वभूमीवरच सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ही बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियुक्त झालेले राकेश ओला हे २०१२ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव आणि नागपूर येथे पोलिस उपायुक्त तसेच पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. अलीकडेच त्यांची बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती.
गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून, अमरावतीत ते कायदा व सुव्यवस्थेवर कोणता ठसा उमटवतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


