अमरावती प्रतिनिधी
अमरावतीत लाचखोरीच्या आणखी एका प्रकरणाने पोलिस दलाची पुन्हा एकदा प्रतिमा धुळीस मिळवली आहे. अवधुतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेश रणधीर यांना तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे विभागातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक रणधीर यांच्याविरोधात याच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमरावती लाचलुचपत विभागाने तपासाची पुढील सूत्रे हातात घेतली आहेत. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच मागणीच्या घटना चिंताजनकरित्या वाढत असल्याचे ACB सूत्रांचे म्हणणे आहे.
काय आहे समोर आलेले प्रकरण?
तक्रारदार यांचा मित्र आर्थिक अडचणीत असल्याने त्याला १० लाखांची उसनवारीने मदत करण्यात आली. निश्चित मुदत उलटूनही पैसे परत न मिळाल्याने तक्रारदारांनी अवधुतवाडी ठाण्यात दाद मागितली. यानंतर या प्रकरणातील पैसे वसूल करून देण्यासाठी निरीक्षक रणधीर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५ लाख, त्यानंतर ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
तडजोडीअंती एक लाख रुपयांवर व्यवहार ठरला, परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने थेट ACB शी संपर्क साधला. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात रणधीर हे एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात सापडले.
ACB पथकाने ही कारवाई अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या परिसरातच केली. पुढील तपास सुरू आहे.


