अमरावती प्रतिनिधी
आनंदाचा दिवस… दोन कुटुंबांच्या मिलनाचा क्षण… आयुष्यभर स्मरणात राहील असा शुभसोहळा. परंतु, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात एकाच क्षणात हा उत्सव मातमात बदलला. पुसला गावातील कोतवाल अमोल गोड यांचा लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली.
पुसला तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असलेले अमोल गोड यांचा आज विवाहसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शुभमंगल सावधानचे मंगल शब्द कानावर घुमत असताना दोन्ही कुटुंबांचे चेहरे आनंदाने उजळले होते. नवदांपत्याला शुभेच्छांचा वर्षाव होत होता. मात्र, नियतीने या आनंदावर क्षणात पाणी फेरले.
विवाहसोहळा आटोपून अवघा अर्धा तास लोटत नाही तोच अमोल अचानक कोसळले. पाहुण्यांनी धावाधाव करत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. परंतु तोपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
आनंदात न्हाऊन निघालेला मंडप काही क्षणांतच रडवेला झाला. वधूच्या आणि वराच्या दोन्हीही कुटुंबांवर शोककळा पसरली. हसण्या-गाण्याचा माहोल क्षणात सुन्न झाला. गावात आणि तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमोल गोड यांच्या अचानक निधनाने पुसला गावावर दु:खाचे सावट दाटले असून, “लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू” ही बातमी संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे.


