स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबईतील कुलाबा आणि धारावी परिसरात बनावट नावाने व कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा अफगाणी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे परदेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्यासंदर्भात मोठा मुद्दा उघड झाला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कक्ष १ आणि कक्ष ५ च्या पथकांनी स्वतंत्ररीत्या सापळा रचून संशयित अफगाणी नागरिकांना फोर्ट, कुलाबा आणि धारावी परिसरातून ताब्यात घेतले. तांत्रिक तपासणी व कौशल्यपूर्ण चौकशीतून त्यांनी भारतात बनावट नावाने राहिल्याचे समोर आले.
सदर अफगाणी नागरिक हे सन २०१५, २०१७ आणि २०१९ दरम्यान वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांनी बनावट नाव व कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या देशात वास्तव्य सुरू ठेवले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत अब्दुल समद हाजी अहमद झाई नौरोजी (४७), मोहम्मद रसोल कमलुद्दीन खाकसर (२४), अमील उल्लाह (४८), झिया उल हक अहमदी (३६), मोहम्मद इब्राहिम गजनवी (३६) आणि असद खान तारा काई (३६) हे सर्व मूळ अफगानिस्तानमधील कंधार, काबुल आणि झाबुल येथील रहिवासी आहेत.
या सर्वांवर बनावट नावं आणि कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीररीत्या राहिल्याचा आरोप असून, त्यांना लवकरच अफगानिस्तानमध्ये परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त मुंबई देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी दक्षिण) दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर आणि कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


