मुंबई प्रतिनिधी
हवामानातील बदलत्या घडामोडींमुळे राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असून, त्याचा परिणाम म्हणून मुंबई,नाशिक, धुळे, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि रायगडसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही प्रणाली सध्या मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकत असून, याचा परिणाम पुढील काही दिवस महाराष्ट्रावर दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवार, म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषत: नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर), सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत ही प्रणाली उत्तरेकडे आणि ईशान्येकडे सरकणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ तयार होण्याची, तर 28 ऑक्टोबरपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
या प्रणालीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


