मुंबई प्रतिनिधी
मुंबई, २७ ऑक्टोबर : धारावीतील एका रहिवासी सोसायटीत आज सकाळी भीतीचे सावट पसरले, जेव्हा लिफ्टच्या पंख्याच्या वरच्या पोकळीत साप लपलेला आढळला. घटनेची माहिती सकाळी सुमारे १०.१५ वाजता वन्यजीव बचावासाठी कार्यरत मुंबई-ठाणे ग्रुपला मिळाली.
त्यानंतर माहीम पोलिस वसाहतीतील पोलिस सर्पमित्र सचिन मोरे यांनी तात्काळ संपर्क साधून ही माहिती संबंधित वनविभाग अधिकारी, ‘राउंड ऑफिसर हर्षल साठे आणि ठाण्याच्या तीन हात नाका येथील वनपरिक्षेत्र, मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस, ‘यांना दिली.
मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितरीत्या सापाला लिफ्टमधून बाहेर काढून बरणी मध्ये बंद केले. सोसायटी रहिवाशांच्या मते, हा साप गेल्या महिन्याभरापासून परिसरात फिरताना दिसत होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर साप तीन फूट लांबीचा अतिविषारी नाग असून, त्याला पकडल्यानंतर रहिवाशांना सापांविषयी योग्य माहिती देत त्यांची भीती दूर करण्याचे उत्कृष्ट कार्य मोरे यांनी केले.
नंतर वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सापाला त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सर्पमित्रांचे आवाहन: “साप दिसल्यास घाबरू नका, स्वतःहून काही कृती करू नका; तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा.


