मुंबई प्रतिनिधी
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी परिस्थितीचा आढावा घेत विशेष हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, बचाव व समन्वय प्रक्रियेची जबाबदारी मंत्री Girish Mahajan यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हेल्पनंबरवर संपर्क साधून अडकलेल्या नागरिकांची माहिती, त्यांचे सध्याचे ठिकाण आणि आवश्यक मदतीविषयी तपशील नोंदवता येणार आहे. या माध्यमातून संबंधित भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय तसेच स्थानिक प्रशासनाशी त्वरित समन्वय साधला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
उड्डाणांवर परिणाम; परतीचा प्रवास ठप्प
पश्चिम आशियातील काही आखाती देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रोजगार, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील नागरिक परतीच्या उड्डाणांअभावी अडचणीत सापडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन समन्वय यंत्रणा कार्यान्वित केली.
जिल्हास्तरावरून माहिती संकलन
मंत्री गिरीश महाजन हे केंद्रीय यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवणार असून, जिल्हास्तरावरून अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत केली जाणार आहे. उड्डाण सेवा पूर्ववत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचा आराखडा तयार केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, दुबईतील सामाजिक संस्थेकडूनही स्वतंत्र हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे. +97150635435 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘घाबरू नका, सरकार पाठीशी’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवून अद्ययावत माहिती देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
आखाती देशांतील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा पुढाकार दिलासादायक मानला जात असून, हेल्पलाईन आणि समन्वय यंत्रणेच्या माध्यमातून मदतकार्य प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


