बीड प्रतिनिधी
धुळवडीचा उत्साह साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २२ वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. बीड शहरातील रामतीर्थ परिसरात राहणारा कृष्णा जालिंदर मुळे हा मित्रांसमवेत धुळवड साजरी करण्यासाठी निघाला असताना शिरूर रोडवरील नागऱ्याचीवाडी येथे झालेल्या कार अपघातात जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि त्याचे काही मित्र दोन वाहनांतून पहाटे एका रिसॉर्टकडे निघाले होते. सणाचा उत्साह आणि तरुणाईची बेफिकिरी अशा वातावरणात प्रवास सुरू असतानाच भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्यावरून घसरत तब्बल चार वेळा उलटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. उलटलेली कार शेतातील विहिरीच्या कठड्याला धडकून थांबली. कठडा नसता तर वाहन थेट विहिरीत कोसळण्याची शक्यता होती, असे स्थानिकांनी सांगितले.
मागून येणाऱ्या मित्रांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र कृष्णा तोपर्यंत निष्प्राण झाला होता. या अपघातात प्रसाद खोले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. यश पेंढारे आणि अन्य एक मित्र बीडमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ परिसरात शोककळा पसरली. पहाटे घरातून उत्साहाने बाहेर पडलेला मुलगा काही तासांत मृतावस्थेत परत आल्याने मुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वेग आणि वाहनचालकाची निष्काळजीपणा याबाबत चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


