मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी सोमवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत परस्पर सहकार्य, शहरी विकास आणि दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी जपानच्या वाणिज्य दूतावासातील उपवाणिज्यदूत तथा परराष्ट्रीय व्यवहार विभागाचे प्रमुख निशिओ रिओ उपस्थित होते.
सुमारे पावणेचार वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल कोजी यांनी तावडे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. जपान-भारत आर्थिक संबंधांचा प्रारंभ मुंबईतून झाला, याची आठवण करून देताना त्यांनी जपानमधील योकोहामा आणि मुंबई यांच्यातील ‘भगिनी शहर’ संबंध अधोरेखित केले. दोन्ही महानगरांचे भौगोलिक साम्य, सागरी किनारपट्टी आणि व्यापारी वैशिष्ट्ये यामुळे सहकार्याच्या संधी अधिक व्यापक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील किनारी रस्ता आणि मेट्रोसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे सांगताना, बुलेट ट्रेनसह विविध नागरी प्रकल्पांत जपानकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर तावडे यांनी आपल्या कार्यकाळात प्राधान्यक्रमाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार काटेकोरपणे कामकाज केले जाईल, असे सांगितले. मुंबई महापालिकेसोबत काम करताना जपान सरकार अथवा तेथील संबंधित संस्थांना आवश्यक ते सहकार्य देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीतून मुंबई-जपान संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


