मुंबई प्रतिनिधी
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमधून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला असून, राज्यातील ४१६ वसतिगृहांचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे चालविली जातात. यांपैकी बहुसंख्य वसतिगृहांच्या नावात ‘मागासवर्गीय मुलांचे/मुलींचे वसतिगृह’ असा उल्लेख आहे. काही वसतिगृहांना मात्र यापूर्वीपासूनच महापुरुषांची नावे देण्यात आली असून ती नावे कायम ठेवण्यात येणार आहेत.
समानतेचा दृष्टिकोन
‘मागासवर्गीय’ हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित व शोषित घटकांसाठी वापरला जात असला, तरी तो सामाजिक विषमता अधोरेखित करणारा असल्याची भूमिका सरकारने आदेशात मांडली आहे. या शब्दप्रयोगामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट प्रवर्गापुरती मर्यादित राहते, असे नमूद करत सकारात्मक व समावेशक प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशाने नामांतराचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापुरुषांच्या नावांचा सन्मान
निर्णयानुसार, सर्व मुलांच्या वसतिगृहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह असे नाव देण्यात येणार आहे, तर मुलींच्या वसतिगृहांना सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह हे नाव देण्यात येईल.
केवळ सातारा येथील एका मुलींच्या वसतिगृहास अहिल्याबाई होळकर शासकीय वसतिगृह असे नाव देण्याचा अपवाद करण्यात आला आहे. यापूर्वी ज्या वसतिगृहांना संत तुकाराम, संत सखुबाई, संत रामदास, संत गाडगे महाराज आदी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, ती नावे कायम ठेवण्यात येणार आहेत.
४१६ वसतिगृहांचे नामांतर
४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांचे नामांतर करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित वसतिगृहांना आधीच महापुरुषांची नावे असल्याने त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
समाजकल्याण आयुक्तालयाने मागील वर्षी राज्य सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. त्यावर विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. वसतिगृहांच्या नावांतील बदल हा त्याच सामाजिक संवेदनशीलतेचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


